Tuesday, 22 October 2024

दिवाळीची एक आठवण

               शाळेत असताना दिवाळीच्या सुट्टीत आम्हाला आकाशकंदील तयार करून आणायला सांगायचे. सर्वजण आपापल्या परीने तयार करून आणायचे. घरामधून दहा-पंधरा रुपये मिळायचे, त्यातून आम्ही कागद आणि चिटकवण्यासाठी डिंक घेऊन येत असू, आणि त्यातून आकाशकंदील बनवायचो. एकदा आकाशकंदील तयार झाला तरी त्यात काहीतरी कमी राहायचं, म्हणून पुन्हा घरातून पैसे घेऊन तो चांगला करण्याचा प्रयत्न करायचो. पण शेवटी काय, तो कधीच चांगला बनायचा नाही. जेव्हा शाळा सुरू व्हायची, तेव्हा सगळे आपापले आकाशकंदील दाखवायचे, आणि मला वाटायचं की माझ्या आकाशकंदिलात काहीतरी कमी आहे, इतरांचे जास्त चांगले आहेत.

हे मनात खोलवर बसलं होतं. म्हणून २०११ मध्ये ठरवलं की यावेळी एक छान आकाशकंदील बनवायचाच.आणि थोडेफार पैसे देखील होते. घराजवळ पडलेल्या वस्तू वापरून आणि कलर कागद आणि फेविकॉल आणून, एक सुंदर असा आकाशकंदील बनवला. तो खूप मोठा झाला होता. घरात लावण्यासाठी जागाच सापडत नव्हती. शेवटी घराच्या शेजारी असलेल्या झाडाला एक मोठा बांबू बांधून, त्यावर तो आकाशकंदील लावला. घरातून वायर घेऊन मोठा बल्ब लावला. घराच्या पुढे रोड असल्यामुळे येणारे-जाणारे लोक तो आकाशकंदील पाहत होते. सर्वजण विचारायचे, "हा आकाशकंदील कुठे मिळतो?" तर मी सांगायचो, "हा कुठे मिळत नाही, हा मी स्वतः बनवला आहे." काही लोक खुश होऊन म्हणायचे, "आम्हालाही असाच हवा आहे, किती रुपये होतील?"

तो आकाशकंदील मी ३०-४० रुपयांत तयार केला होता, पण लोकांना दीडशे रुपये सांगायचो. मी त्यांच्याकडून आधी पैसे घेत होतो, पन्नास रुपये देऊन तो कागद आणि फेविकॉल आणायचा, आणि मग मी आकाशकंदील बनवून द्यायचो. घरातले सगळे जण मदत करत होते – आई, भाऊ कागद कापून देत होते, आणि मी आकाशकंदील बनवायचो. त्या आठवड्यात मी छोटे-मोठे आकाशकंदील बनवून दिले आणि त्यातून साधारण दोन हजार रुपयांचा नफा झाला. त्या वेळेस ती रक्कम माझ्यासाठी खूप मोठी होती.

 दोन हजार रुपये मिळाल्यावर मी खूप खुश झालो होतो. शाळेत जरी माझा आकाशकंदील चांगला बनला नसेल, तरी कॉलेजमध्ये केलेला आकाशकंदील सर्वांना खूप आवडला. त्यातून मला मनापासून आनंद झाला. पण २०११ नंतर, कॉलेज आणि जॉबमुळे पुन्हा आकाशकंदील बनवायला वेळ मिळाला नाही. आता, १३ वर्षांनी, मनातून वाटलं की पुन्हा एकदा आकाशकंदील तयार करावा. यावेळी जरी तो २०११ मध्ये केलेल्या आकाशकंदिलासारखा झाला नसला, तरी त्याची आठवण अजूनही मनात आहे. 

💥✨*सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी आनंद, समृद्धी आणि चैतन्य घेऊन येवो*💐💐

No comments:

Post a Comment